डोक्यावरचा हंडा उतरणार कधी?

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

पाणीटंचाईच्या झळा बसू नये, याकरीता प्रशासनाने अनेक उपाय केले. मात्र तरीही रायगड जिल्ह्यातील 56 गावे व 244 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने, हंडाभर पाण्यासाठी दोन मैल जीवघेणी डोंगरकपारीतील खडतर पायपीट महिलांना करावी लागत आहे. गेली कित्येक वर्षे प्रशासनाला हा प्रश्‍न सोडविण्यात यश आलेले नाही. परिणामी, आमच्या डोक्यावरचा हंडा अजून किती वर्षांनी उतरेल, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.

पाणी म्हणजेच जीवन आहे याचा जीवघेणा प्रत्यय टंचाईग्रस्त आदीवासीवाडीवर गेल्याशिवाय कळत नाही. हंडाभर पाण्यासाठी दररोज मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्यच त्यांच्या नशिबी आले आहे. ग्रामीण भागातील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालताना फार त्रास होतो. हंडाभर पाण्याचे मोल किती आहे, हे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरु झाला की, पाणीप्रश्‍न तोंड वर काढतो. त्यात महिला आणि लहान बालके यांच्या डोक्यावर हंडे-घागरी, सायकलीला अडकवलेली केंड-घागरी, हातगाड्यावर पाण्याच्या टाक्या, घागरी व इतर माध्यमातून पाणी मिळवण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येते. हे चित्र प्रत्येक उन्हाळ्यात कमी-अधिक फरकाने दिसते. अलीकडे काही पुरुषमंडळी घरातील महिलांबरोबर पाणी भरण्याच्या मदतीसाठी येत असल्याचे दिसतात. या वर्षी देखील अनेक ठिकाणी टंचाईग्रस्त गावांना 45 शासकिय टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रशासनाने अनेक उपाय करुनही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाईचा फटका जास्त गाव-वाड्यांना बसला असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून समोर आली आहे. गतवर्षी याच दिवशी 48 गावे व 158 वाड्यांना 29 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी त्यामध्ये वाढ झाली असून आता 8 गावांची वाढ झाली आहे; तर 86 वाड्यांची अधिक भर पडली आहे. रायगड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. अनेक गावे, वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. रोहा तालुक्यातील भातसईपासून लक्ष्मीनगर, झोळांबे मधील नागरिकांना चातक पक्षी प्रमाणे पंधरा – पंधरा दिवस पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. पाण्यासाठी दोन किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे महिला वर्ग प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. घरपोच कधी पाणी मिळणार असा सवाल प्रत्येक महिलेच्या वर्गामध्ये दिसून येत आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन अंतर्गत प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी देण्याची घोषणा करण्यात आली. रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. गावागावात मुबलक पाणी वेगवेगळ्या जलस्त्रोतामार्फत देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. तरीदेखील जिल्ह्यामध्ये मे महिन्यात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. जिल्ह्यात तीनशेहून अधिक गावांना 43 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याची टंचाईने चाकरमानीदेखील त्रस्त झाले आहे. मे महिन्याच्या सुट्टीत गावे आलेले मुंबईकरांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत असताना महिला वर्गांमध्येदेखील संताप निर्माण झाला आहे.

लक्ष्मीनगर परिसरात दोन किलो मीटर पायपीट
रोहा तालुक्यातील भातसई, लक्ष्मीनगर, झोळांबे अशा अनेक गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. पंधरा पंधरा दिवस गावांमध्ये पाणी येत नाही. त्यासाठी दोन - दोन किलो मीटर पायपीट करीत पाण्याची वाहतूक करीत आहेत. गावांतील शाळकरी मुलांना उन्हाळी सुट्टी पाणी भरण्यासाठी घालवावी लागत आहे. अनेक वेळा भर दुपारी उन्हात पाणी भरण्याची वेळ महिलांवर येत आहे. काहीजण डोक्यावर हंडे घेऊन तर काहीजण मोठ मोठे पाण्याचे ड्रम भरून दुचाकीवरून पाण्याची वाहतूक करीत आहेत. या भागात पाण्याची समस्या कायमच निर्माण झाली आहे. ती सोडविण्यास प्रशासन उदासीन ठरत आहे. वेगवेगळ्या पाण्याच्या योजना राबवूनदेखील पाणी मिळत नसल्याने महिला वर्गात संताप निर्माण झाला आहे.
20242023
56 गावे48 गावे
244 वाड्या158 वाड्या
45 टँकर29 टँकर
Exit mobile version