रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात
। माथेरान । वार्ताहर ।
ई-रिक्षामुळे माथेरानमध्ये पर्यटन क्रांती घडत आहे. परंतु, या रिक्षाच्या मार्गात अनेक ठिकाणी दगडगोटे आणि खराब रस्त्यामुळे प्रवास करताना रिक्षाला खर्चिक बाब होत आहे. तर, काही भागात खाचखळग्यातून जाताना त्रासदायक बनत होते. येथील वखारी नाक्यापासून ते पांडे रोडच्या पुढील भागापर्यंत पावसाळी पाण्याच्या प्रचंड ओघाने खूपच रस्ता खराब झाला होता. याकामी अनेकदा लोकांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. याकामी प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन या रस्त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले. त्यानुसार या रस्त्याची कामे सद्यःस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे पायी चालत जाणार्या, त्याचप्रमाणे ई-रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे. अशाप्रकारे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची वाताहत झाली आहे, ते रस्तेसुद्धा जलदगतीने दुरुस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.