| आगरदांडा | प्रतिनिधी |
कांदळवनाचे वृक्षारोपण हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुरूड तालुका किनारपट्टीवर कांदळवन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न फणसाड वन्यजीव अभयारण्याकडून केले जात आहेत. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून मुरूड फणसाड वन्यजीव अभयारण्याच्या वतीने उपवनसंरक्षक राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बोर्ली मांडला ग्रामपंचायत हद्दीतील ताराबंदर फणसाड वन्यजीव अभयारण्याच्या कांदळवनाच्या क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कांदळ, तिवर, पांढरी चिपी या वृक्ष प्रजातींची 100 रोपांची लागवड केली. त्याबरोबर ताराबंदर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला.
यावेळी उपवनसंरक्षक राजेंद्र गवई, वनपरिक्षेत्र अधिकारी नितिन ढगे, वनपाल आदेश पोकळ, किरण मोरे, हरिश्चंद्र नाईक, वनरक्षक नामदेव मुंढे, करेबा खांडेकर, योगेश महिरे, गौरक्षक भांबरे, शशिकांत आरोठे, अभिजित पाटील, सुर्यकांत कुर्मिले, रूपेश, देवरे, वनपुर्णजीवन आणि पर्यावरण शास्वती संस्थेचे नेहा सिंग, एस.आर.धनुष्य, प्राची पवार, वृषाली डांगे, तसेच तारांबदर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वनपाल आदेश पोकळ आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कांदळवनाची मुळे मासळीच्या प्रजननासाठी हे क्षेत्र उपयुक्त ठरते. फांद्या वादळ आणि लाटांपासून संरक्षण करतात, तसेच कांदळवन वृक्षारोपमुळे किनारपट्टीचे धूप थांबवणे, त्याबरोबर समुद्राच्या वाढत्या पातळीपासून संरक्षण, जैवविविधता टिकवणे आदिंसह या कांदळवण वृक्षारोपणातून फायदा होत असतो, असे मत यावेळी आदेश पोकळ यांनी केले.







