धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड संवर्धन मोहीम

। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान झाडे लावत नाही, तर त्यांचे संगोपन करतात. पदमश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड परिसरातील 83 श्रीसदस्य सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत मुरुड ग्रामीण हॉस्पिटल, तहसीलदार कार्यालय, समुद्रकिनारी, राजपुरी व डोंगरी परिसरातील लावलेल्या झाडांना स्वच्छ करून त्यांना कुंपण केले. परिसरातील गवत काढून कचरा गोळा केला आणि रिकाम्या जागेत नवीन झाडे लावली. असा उपक्रम दरवर्षी राबविल्याने लावलेली झाडे आता मोठी झाली आहेत. परिसर सुंदर दिसू लागला आहे.

डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी नेहमी श्रीसदस्यांना शिकवण देतात की, झाडांना आपल्या घरातील सदस्य समजा. त्यांच्या संगोपनासाठी लागणारे पाणी, खत द्या. त्याला कुंपण करून जागवा. घरातील माणसांना जसे जपतो तसे झाडांना जपा हीच झाडे तुमच्या कुटुंबाला सांभाळणार आहेत. पुढे येणार्‍या वातावरणातील बदलला सामोरे जाण्यासाठी झाडाची संख्या वाढली पाहिजे. श्रीसदस्य पावसाळ्यात झाडे लागवड करतात. त्यांची निगा राखतात. दर शुक्रवारी पाण्याच्या टाक्या टेम्पोत घेऊन प्रत्यक्ष झाडाला पाणी देण्याचे काम करतात.

दरम्यान, मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडेे जाणार्‍या रस्त्यावर प्रतिष्ठानतर्फे झाड लावण्यात आली आहेत. तसेच ती जगवण्यात आल्याने पर्यटकांना झाडे आनंद देत आहेत.

Exit mobile version