वावे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |

वाढते शहरीकरण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल राखण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण पिढी आता पुढे येत आहे. याचाच एक आदर्श वस्तुपाठ सुधागड तालुक्यातील वावे गावाने घालून दिला आहे. ग्रामस्थ मंडळ वावे आणि वावे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.19) जुलै रोजी परिसरात विशेष वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत वावे गाव ते सनशील्ड कंपनी आणि वावे गाव ते मजरे जांभूळपाडा बसस्टॉप दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा तब्बल 100 वृक्षांची लागवड करण्यात आली.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाटसरूला भविष्यात मायेची सावली मिळावी आणि परिसरातील पर्यावरणाचा समतोल उत्तम प्रकारे राखला जावा, हा या वृक्षारोपणाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी वड, पिंपळ, कडुनिंब यांसारख्या विविध सावली देणाऱ्या आणि पर्यावरणाला पूरक असणाऱ्या झाडांची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, वावे गावातील सर्व तरुण आणि तरुणी दरवर्षी न चुकता अशा प्रकारच्या पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण मोहिमा राबवत असतात. केवळ झाडे लावणे एवढ्यावरच न थांबता, लावलेल्या झाडांचे पुढील काळात संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही हे तरुण अगदी मनापासून पार पाडतात. त्यांच्या याच सातत्यपूर्ण आणि कौतुकास्पद कार्यामुळे आज अनेक स्तरांतून वावे गावातील युवाशक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version