| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील रोहा व नागोठणे या दोन शहरांना जोडणार्या भिसे खिंडीतील उतारावरील झाडे प्रवास व वाहतुकीच्या दृष्टीने सध्या धोकादायक ठरत आहेत.
मुसळधार स्वरूपातील पावसामुळे डोंगर उताराची झीज होऊन या खिंडीतील जेमतेम मातीचा आधार असलेली काही झाडे यापूर्वीही कोसळली आहेत. खिंडीतील उतारावर काही झाडे कोणत्याही स्थितीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेता सदरील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
रोहा-नागोठणे मार्गावरून रात्रंदिवस नेहमीचीच सुरू असणारी प्रवासी वाहतूक व अन्य वाहतुकीचा विचार करता येथे कायमच वर्दळ दिसून येते. तरी, गतवर्षी पावसाळ्यात या खिंडीत दोन वेळा उतारावरील झाडे कोसळून दरड कोसळण्याच्य घटना घडल्या आहेत.तरी संबंधित प्रशासन यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी प्रवासीवर्गातून केली जाऊ लागली आहे.