| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारे अवेटी ते कोंजरवाडी आदीवासीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे चांगल्या रस्त्यासाठी अवेटीपासून कोंजरवाडी येथील ग्रामस्थ बुधवारी (23 ऑगस्ट) रोजी एकवटले. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
कुर्डूस अंतर्गत येणाऱ्या कोंजरवाडी येथे आदिवासीवाडी असून या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या संख्येने राहत आहेत. मोलमजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. या वाडीकडे जाणारा रस्ता कच्चा असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था दयनीय होत असून या मार्गातून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शाळकरी मुले, रुग्ण व बाजारहाटासाठी जाणाऱ्या या खराब रस्त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या वीटभट्टी मालकाच्या अवजड वाहनांच्या होणाऱ्या वाहतूकीमुळे रस्त्यावर परिणाम झाला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरण करण्याबरोबरच रस्त्याची दुर्दशा करणाऱ्या विटभट्टी मालकांना जरब बसविण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी हरिश्चंद्र पाटील, हरिश्चंद्र नाईक, शेखर पाटील, बळीराम नाईक लहू नाईक, कमळाकर नाईक, आदीवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश नाईक, आदिम आदिवासी समाज विकास सेवा संस्थेचे सुरेश नाईक आदी पदाधिकारी व आदीवासी समाजाचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.