। नेरळ । प्रतिनिधी ।
आदिवासी भागातील नळपाणी योजनांची कामे सुरू असून, अनेक वर्षे या नळपाणी योजनांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे आदिवासी पट्ट्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या सर्व योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि पाणीटंचाई असलेल्या आदिवासी भागाला टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आदिवासी संघटनेने कर्जत पंचायत समिती व पाणी पुरवठा विभाग यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कर्जत तालुका हा आदिवासी भाग आहे. येथील वाड्या वस्त्यांवर शासनाच्या पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, त्या योजनेंची कामे देखील सुरू आहेत. त्यातील काही नळपाणी योजना पुर्ण होऊन बंद स्थितीत आहेत. तर, नव्याने आलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसाठी करोडो रुपये निधी खर्च करूनही पाणी मिळत नसेल तर ते आदिवासी समाजाचे दुर्दैव समजावे का, असा प्रश्न येथील आदिवासी करत आहेत.
या संदर्भात कर्जत पंचायत समिती व पाणी पुरवठा विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे पट्टा, नेरळ विभाग, कशेळे विभाग, कळंब विभाग, कर्जत या विभागात अपूर्ण स्थितीत ज्या योजना आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्यात. बंद स्थितीत असलेल्या योजना सुरळीत कराव्यात. तसेच, पाणी टंचाई भागात तातडीने टॅकरने पाणी पुरवठा सुरु करावा. असे न केल्यास आदिवासी समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, महिला अध्यक्षा जयवंती हिंदोळा, उपाध्यक्ष मंगळ केवारी, सचिव भगवान भगत, माजी अध्यक्ष जैतू पारधी,राजू झुगरे, मनोहर ढुमणे, गणेश पारधी, बबन शेंडे, वाळकू चौधरी आदी उपस्थित होते.