टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट वीज प्रकल्पाच्या कॉलनीसाठी महाराष्ट्र शासनाने भालिवडीतील लाखाची वाडी येथील 96 एकर जमीन 30 वर्षांच्या भाडे करारावर दिली आहे. त्या जमिनीवर राहती घरे आणि शेती असतानाही टोरंट कंपनीसाठी जागा दिल्याने येथील आदिवासी लोक आक्रमक झाले आहेत. त्यांनी जागृत कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच, “राहती घरे सोडून आम्ही कुठेही जाणार नाही आणि टोरंट कंपनीला तर अजिबात जमीन देणार नाही,” असा निर्धार देखील केला. यावेळी प्रांत अधिकारी अनुपस्थित असल्याने प्रांत अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार पवार यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना, कार्यकर्ते शंकर हिलम यांनी, “आमच्या पाच आदिवासी वाड्या 96 एकराच्या जमिनीवर वसल्या आहेत. पूर्वी या जमिनीमध्ये आमचे आदिवासी लोक नाचणी, वरी व इतर कडधान्य लावत होती. मात्र, आता या ठिकाणी भात शेती आणि भाजीपाला लावला जातो. त्यामुळे आम्ही आमची जमीन देणार नाही,” असे सांगितले. तर, संघटनेचे अध्यक्ष केशव पवार यांनी, “जरी आम्ही अडाणी असलो तरी आमची पोरं बाळं आता शिकलेली आहेत. ती देखील या शेतीमध्ये राबत आहेत. हे लोक तिथे येऊन आम्हाला आमच्या जागेवरून हकलवत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणाचे आम्हाला सहकार्य हवे आहे,” असे ते म्हणाले. सुशीला भोई यांनी, “या ठिकाणी आम्ही चार पिढ्यांपासून राहत असून, पूर्वजांपासून येथील जंगल राखलेले आहे. जो आम्हाला जंगलात जाण्यासाठी रस्ता आहे तो रस्ता देखील पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे हे सरकार नक्की कोणाच्या बाजूने काम करीत आहे,” असा सवाल देखील त्यांनी केला. दरम्यान, “ही जागा आम्ही देणार नाही. आम्हाला आणखी आंदोलने करावी लागली तरी चालतील. आम्ही त्यासाठी अलिबागला जाऊन मोर्चा काढू, पण ही जागा आम्ही तुम्हाला देणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला.

Exit mobile version