आदिवासी विद्यार्थ्यांनी बांधली वृक्षांना राखी

रक्षाबंधनाला वृक्षबंधनाचा ‘अंकुर’

| रायगड । प्रतिनिधी ।

रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन, भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. सद्यस्थितीला पर्यावरणाचा असमतोल बघता वृक्षाचे रक्षण करण्यासाठी अंकुर ट्रस्टच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणार्‍या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. अंकुरच्या मुलांनी या स्नेहरूप बंधनाचा प्रतीकात्मक रूपाने निसर्गाची बांधिलकी कृतीतून स्वीकारली.

समाज, परिवार आणि सगेसोयरे सर्व त्यागून जगदगुरु संत तुकोबा रायांच्या अभंगातील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या ओळी सामाजिक, नैसर्गिक बांधिलकी जोपासणे ही मानवाची जबाबदारी आहे असे सांगतात. आणि हे खरेच सत्यामध्ये उतरविण्यासाठी रायगड जिल्ह्यात पेण येथील अंकुर ट्रस्टच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी ऑक्सिजन देऊन माणसांना जगविणार्‍या वृक्षांना राखी बांधून सामाजिक सलोखा राखला आहे. निसर्ग आपला सखा आहे. याची जाणीव या उपक्रमातून घडवून दिली. म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या या ओळी सार्थकी ठरतात. असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

लोकपरंपरा आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणे हे प्रत्येक मानवी संस्कृती जपणारे नागरिकांचे कर्तव्य आहे. असाच हा एक उत्सव रक्षाबंधन (राखी) आहे. मोठ्या आनंदाने बहीण ही भावाला ओवाळणी घालून रक्षाबंधन बांधून रक्षा करावी अशी मनोकामना करते. हा दृष्टांत ठेवून अंकुर ट्रस्टच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी झाडांची म्हणजे वृक्षांची रक्षा करण्यासाठी रक्षाबंधने बांधली. वृक्षांची संवर्धन करावी, झाडे लावावी-झाडे जगवावी, वृक्षांची कत्तली होणार नाही, असेही याप्रसंगी सांगण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील संस्थापक असलेल्या अंकुर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेत एकुण 70 कातकरी व स्थलांतरित मजुरांची मुले शिक्षण घेत आहेत. आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात नसरीन मणियार, दिपाली व संदिप फडणीस, विलास पाटील व संस्थेचे विश्‍वस्त ए.राज हे उपस्थित होते. यावेळेस आदिवासी बालकांनी झाडांना राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधनास सुरूवात केली.

आदिवासी बालकांना अंकुरच्या कार्यकर्त्या श्रुती तिमाने यांनी इको फ्रेंडली राख्या बनवायला शिकवल्या. दीपाली फडणीस यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तर नसरीन मणियार यांनी मिठाई वाटप केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी विद्यार्थीनी चैताली आखाडे हिने केले तर आभार प्रदर्शन स्नेहल जाधव हिने केले. या कार्यक्रमासाठी लंकेश गवस व किर्ती सुर्वे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version