| मुंबई | प्रतिनिधी |
नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘उलगुलान’ पायी मोर्चावरून मुंबईत वाद निर्माण झाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.28 सप्टेंबर रोजी नाशिकहून मोर्चाला सुरुवात झाली. आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्याने विद्यार्थी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये थांबले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी कारवाई केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
विविध मागण्यांसाठी गेल्या 42 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी नाशिकहून मुंबईच्या आझाद मैदानाकडे पायी मोर्चा सुरू केला होता. यादरम्यान, मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने विद्यार्थी मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनमध्ये थांबले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी कारवाई केल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटेच्या सुमारास पोलीस टिळक भवनमध्ये आले. सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले आणि त्यानंतर काही विद्यार्थिनींना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर तीन विद्यार्थिनींना ताब्यात घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी महिला पोलीस उपस्थित होत्या, मात्र विद्यार्थ्यांना नेमके कुठे घेऊन जात आहोत, याची माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून धक्काबुक्की आणि गैरवर्तन झाल्याचाही दावा केला आहे. तसेच, रात्री 2.00 वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना एका ठिकाणी न नेता भिवंडी आणि परिसरात वाहनातून फिरवण्यात आले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, चक्कर आली आणि काही जण बेशुद्ध झाल्याचा दावा करण्यात आला. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी विनंती करूनही तातडीची मदत मिळाली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांना अखेर कल्याण बायपासजवळ सोडण्यात आलं आणि त्यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेल्याचं सांगण्यात आले.
या आंदोलनामागे विद्यार्थ्यांनी वसतिगृह आणि आश्रमशाळांच्या परिस्थितीचे मुद्दे मांडले आहेत. काही वसतिगृहांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह, गाद्या आणि पांघरुणांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पाणी बाहेरून आणावे लागते, तर सेंट्रल किचनमधून येणारे जेवण वेळेत आणि चांगल्या दर्जाचे मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. चोपडा, शहादा, जळगाव, नंदुरबार आणि इतर ठिकाणच्या वसतिगृहांची अवस्था विद्यार्थ्यांनी सांगितली. काही ठिकाणी स्वच्छतागृहांची संख्या कमी असून, इमारतींची दुरवस्था आणि छत गळण्याच्या समस्याही असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मुलींना त्यांच्या तक्रारी मांडल्यामुळे लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री, सचिव आणि आयुक्तांबाबतही मागण्या मांडल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईबाबत काँग्रेसकडूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आंदोलनाची परवानगी का देण्यात आली नाही, असा सवाल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना टिळक भवनमध्ये राहण्याची, जेवणाची आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्याची तयारी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयातून कोणालाही अटक केल्याचा दावा फेटाळला आहे. विद्यार्थ्यांनी मात्र आपल्यावर पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा आरोप कायम ठेवला आहे. आता या विद्यार्थ्यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळणार का आणि त्यांच्या वसतिगृह व आश्रमशाळांशी संबंधित मागण्यांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
आदिवासींचा मुंबईत हुंकार
