बर्लिनमध्ये झळकला तिरंगा

चार पुणेकरांनी पूर्ण केली मॅरेथॉन

| पुणे | प्रतिनिधी |

जगातील प्रमुख सहा मॅरेथॉनपैकी एक असलेल्या बर्लिन मॅरेथॉनमध्ये पुण्यातील चार धावपटूंनी भारताचा तिरंगा फडकविला आहे. साहिल शहा, संदीप बंब, रवी कदम आणि आरती भांडावले यांनी ही मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. जर्मनीतील बर्लिन मॅरेथॉनमध्ये यंदा 47 हजार 912 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जगातील वेगवेगळ्या देशांच्या स्पर्धकांचा समावेश होता. या मॅरेथॉनमध्ये पुण्यातील फिटनेस फर्स्ट इंडिया या संस्थेच्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन ती पूर्ण केली. ही स्पर्धा 42.198 किलोमीटरची होती. यामध्ये फिटनेस फर्स्ट इंडियाचे साहिल शहा यांनी 30 वर्षांवरील वयोगटात भाग घेऊन चार तास 17 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली.संदीप बंब यांनी 50 वर्षांवरील वयोगटात भाग घेऊन चार तास 56 मिनीटे, रवी कदम यांनी 55 वर्षांवरील वयोगटात भाग घेऊन 6 तास 6 मिनीटे या वेळेत ही स्पर्धा पूर्ण केली. आरती भांडावले यांनी 40 वर्षांवरील वयोगटात भाग घेत चार तास 39 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेसाठी चौघांनी चार महिने अगोदरपासूनच तयारी सुरू केली होती. प्रशिक्षक विजय गायकवाड यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

Exit mobile version