टीआरपी गेम झोनला भीषण आग; 32 जणांचा बळी

99 रुपयांची स्पेशल ऑफर, त्यात सुट्टीचा दिवस आणि बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता

| राजकोट | वृत्तसंस्था |

गुजरातच्या राजकोटमधील गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.25) संध्याकाळी घडली आहे. दहापेक्षा अधिक जणांना वाचवण्यात आले आहे. तर आगीच्या ठिकाणी आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. आगीत गेमझोन जळून खाक झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, आग लागली त्यावेळी गेमझोनमध्ये मोठी गर्दी होती. तसेच, याठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठाही असल्याची माहिती समोर आली आहे.

गेमिंग झोनमध्ये आगीच्या घटनेची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, प्राथमिक तपासात इलेक्ट्रिक बिघाडामुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. या गेमिंग झोनला अग्निशमन विभागाकडून एनओसीही मिळाली नसल्याचे समोर आले आहे. याबाबतची अधिक माहितीही अग्निशमन विभागाकडूनच दिली जाणार आहे.

टीआरपी गेम झोनमध्ये 1500 ते 2000 लिटर डिझेल जनरेटर आणि गो कार रेसिंगसाठी 1000 ते 1500 लिटर पेट्रोल साठवलेले होते, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण गेमझोन जळून खाक झाला आहे. गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी 6 ते 7 फुटांचा एकच मार्ग होता. आज प्रवेशासाठी 99 रुपयांची योजना होती, त्यामुळे अपघाताच्या वेळी गेम झोनमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शनिवारी (दि.25) संध्याकाळी जेव्हा ही दुर्घटना घडली, त्यावेळी गेम झोनमध्ये खेळणाऱ्या लोकांपैकी जे पहिल्या मजल्यावरुन बाहेर आले त्यांनी सांगितले की, अचानक गेम झोनमधल्या स्टाफने आम्हाला सांगितले की, आग लागली आहे, तुम्ही तात्काळ बाहेर पडा. त्यानंतर आम्ही सर्वजण तिथून बाहेर पडलो. पहिल्या मजल्यावरुन बाहेर पडण्यासाठी एकच रस्ता होता. दरम्यान, गुजरात राजकोट गेम झोन दुर्घटने प्रकरणी गेम झोनचा मालक आणि मॅनेजरसह 3 लोकांना अटक झाली आहे.

घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर राजकोट पोलीस आयुक्तांनी, शहरातील सर्व गेमझोन तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
Exit mobile version