। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील धान्य गोडाऊनच्या आवारात उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच धाटाव एमआयडीसी अग्निशामक दलाचे दिवे व त्यांच्या टीमने त्वरित प्रतिसाद देत मोठ्या प्रयत्नात आगीवर यशस्वी नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण ट्रकमध्ये असलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे.
दिवाळीत धान्य वाटप करण्यासाठी सरकारी गोडाऊन मध्ये लाखो रुपये किंमतीचे धान्य घेऊन आलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने घडलेल्या आग दुर्घटनेत शासनाचे लाखो रुपये किंमतीचे धान्य जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना रविवारी (दि.19) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास भुवनेश्वर येथील शासकीय गोडाऊनच्या आवारात घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
सामान्य जनतेला पुरवठा करण्यासाठी रोहे शहरा पासून जवळ असलेल्या भुवनेश्वर येथे शासकीय गोदामात वितरण करण्यासाठी धान्य ठेवले जाते. त्यानंतर या गोदामातून सदर माल नियोजित ठिकाणी नेला जातो. मात्र, दिवाळी निमित्त सुट्टी असल्यामुळे रविवारी धान्य भरून आलेला ट्रक गोदामच्या आवारात उभा करुन ट्रकवरील चालक हा गावी गेला होता. या दरम्यान रविवारी रात्री अचानक ट्रकला आग लागली. या आगीत लाखो रुपये किंमतीचे 345 क्विंटल वजनाच्या 691 तांदळाच्या गोणी जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती समजताच नायब तहसीलदार राजेश थोरे यांच्या समवेत संबधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धाटाव एमआयडीसी येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. त्यानंतर जवानांनी सदर आग आटोक्यात आणली.







