बॅटर्‍यांची वाहतूक करणार्‍या ट्रकला आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

| उरण । वार्ताहर ।

भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील जी.डी.एल. या मालाची हाताळणी करणार्‍या गोदामातून बंगलोर शहराकडे बॅटर्‍यांची वाहतूक करणार्‍या ट्रकला मंगळवारी (दि.26) रात्री 8-45 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. सदर आग ही भेंडखळ बस स्थानकानजीकच्या पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर लागली, मात्र ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

भेंडखळ बस स्थानकाजवळील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि.26) रात्रीच्या सुमारास घडलेल्या आगीच्या घटनेसंदर्भात ट्रकचालक दिनेश रमेश घावटे (रा.कोलाड रोहा) यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील जी.डी.एल. या मालाची हाताळणी करणार्‍या गोदामातून विद्युत वाहक बॅटर्‍या घेऊन 25 ट्रक बंगलोरच्या दिशेने मंगळवारी रात्री ठिक 8.30 वाजण्याच्या सुमारास निघाल्या होत्या. ट्रकचालक दिनेश रमेश घावटे हे तहान लागली म्हणून मी भेंडखळ बस स्थानकाजवळ पाणी घेण्यासाठी ट्रकमधून उतरलो. त्यावेळी ट्रकमधून धूर, वास येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी मी मदतीसाठी लोकांना पाचारण केले. तसेच जवळील पेट्रोल पंपावरील अग्नी प्रतिबंध उपकरणे घेऊन आग लोकांच्या मदतीने विझविण्याचा प्रयत्न केला. 100 नंबरवर कॉल केला. परंतु प्रत्युत्तर मिळाले नाही.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्याच दरम्यान उपस्थित नागरिकांनी, लोकांनी ही सहकार्य केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अशी माहिती ट्रक चालक दिनेश रमेश घावटे यांनी दिली. मात्र, ट्रकमधील 24 टन वजनाच्या बॅटर्‍या जळालेल्या असल्याने सध्या रस्त्यावरील निकामी झालेल्या बॅटर्‍या उचलण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version