आरोग्य शिबिरात अनेकांची व्याधीमुक्ती
| कर्जत | प्रतिनिधी |
आयुर्वेद हे प्राचीन काळापासून आहे. त्याचे महत्त्व आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देशांना जास्त आहे. ते त्याचा अभ्यास करीत आहेत. आयुर्वेदाच्या उपचाराने रोग मुळापासून निघून जातो. खरे तर, आयुर्वेद ही भारतीयांची खरी ओळख आहे. ग्रामीण भागात गावांच्या आजूबाजूलाच वनौषधी आहेत, याची तेथील लोकांना माहीत नसते. त्याची माहिती त्यांना करून दिल्यास अनेक व्याधींची मुक्ती होईल’ असा विश्वास कर्जत व माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी व्यक्त केला. कर्जत प्रेस क्लबच्या वतीने स्व. निर्मला देशमुख यांच्या स्मरणार्थ तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर आणि मोफत औषधे वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्योविस आयुर्वेद दादर मुंबईचे विशेष सहकार्य लाभले होते.
आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा शिबिराचे व मोफत औषधे वाटप समारंभाचे आयोजन पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठा मध्ये करण्यात आले होते. सुरेखा भणगे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. मनोहर साबणे, ज्योविस आयुर्वेदाचे डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते, रुग्ण सन्मित्र यशवंत गोरे, तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे, डॉ. सोनाली घाणेकर, अस्मिता सावंत, अॅड. राजेंद्र निगुडकर, महेंद्र निगुडकर आदी उपस्थित होते.
कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष अॅड. राहुल देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागतपर मनोगतात शिबिराचा उद्देश सांगताना आईच्या आठवणीने कंठ दाटून आला. यानंतर डॉ. राज सातपुते, यशवंत गोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुकेश सुर्वे यांनी माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या आठवणींना उजाळा देऊन ‘त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, त्यासाठी तुमचे सर्वांचे सहकार्य हवे आहे,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन उपाध्यक्ष विलास श्रीखंडे यांनी, तर आभार प्रदर्शन खजिनदार मल्हार पवार यांनी केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनंदा कांगणे, श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष रंजन दातार, मनीषा सुर्वे, ज्योती पाटील, पूजा सुर्वे, नितीन दगडे, तानाजी पाटील, अजय गायकवाड, ज्ञानेश्वर बागडे, भूषण प्रधान, पद्मजा देशमुख आदी उपस्थित होते.