कशेडी घाटातील बोगदा पावसाळ्यापूर्वी खुला?

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
कशेडी घाटाला पर्यायी भुयारी महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असून सध्या एका भुयारातील वायुविजनाचे म्हणजेच व्हेंटीलेशनचे काम सुरू झाले आहे. या दोन भुयारांपैकी एका भुयाराची चाचणी पावसाळयापूर्वी केली जाऊन वाहतुकीस प्रारंभ करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला असून तीन पदरी भुयारांमध्ये समोरासमोर वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याच्या तज्ज्ञांच्या मतामुळे दोन्ही भुयारे एकाचवेळी सुरू करण्याचाही निर्णय होण्याची शक्यता असल्याचे याठिकाणी काम करणार्‍या महत्वाच्या व्यक्तींनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील वीर ते भोगाव खुर्द 40 कि.मी. महामार्ग आणि भोगाव खुर्द ते खवटी 1.7 कि.मी भुयारी मार्ग हे दोन महत्वाचे टप्पे पोलादपूर तालुक्याशी संबंधित आहेत.
कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पध्दतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा (1.7 कि.मी.लांबीचे दोन भुयारी मार्ग) तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्वीकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2018 यावर्षी अभियांत्रिकी प्रॉक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत 502 कोटी 45 लाख रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित करण्यात आल्यानुसार लवकरच या रस्त्याचे कामही सुरू होणार आहे. यावर्षी 2022 मध्ये या भुयारी मार्गापर्यंत जाणार्‍या काँक्रीट रस्त्याचे तसेच भुयाराच्या आतील भागातील काँक्रीटीकरणासह खेडबाजूकडे 4 पूल आणि पोलादपूरबाजूकडे तीन पुल उभारण्याचे काम झाल्यानंतर अ‍ॅॅप्रोच रस्ता पूर्ण होणार आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे पोटठेकेदार शिंदे डेव्हलपर्स कंपनी या कामासाठी युध्दपातळीवर प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही भुयारी मार्गांची आपसात जोडणी राहण्यासाठी कनेक्टीव्हीटीचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. आतील भागात परत युटर्न घेणार्‍या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारी मार्गाने होणार आहे.

कशेडी घाटात पावसाळयामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने भुयारी मार्गापैकी एक भुयारी मार्ग खुला करण्यासाठी अभियंते प्रयत्नशील आहे. या भुयाराची चाचणी येत्या पावसाळयापूर्वी केली जाणार आहे. तज्ज्ञांच्यामते तीन पदरी रस्त्यांच्या या भुयारामधून वाहने समोरासमोर येतील, अशी वाहतूक सुरू ठेवल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने दोन्ही भुयारी मार्ग एकाचवेळी सुरू केल्यास मुंबईकडे जाणारी वाहने एका भुयाराने तर दुसर्‍या भुयारीमार्गाने रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवता येणार असल्याचे मत या वाहतुकीसंदर्भात तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने यंदाच्या पावसाळयात एका भुयारी मार्गाची चाचणी होऊनही भुयारी मार्गाने वाहतूक सुरू होण्याची शक्यता दिसून येत नाही.

हवेसाठी भूयार
आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन म्हणजे व्हेंटीलेशनच्या सुविधेचे एक भुयार तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. कशेडी भागातील डोंगरातून या भुयारी मार्गाचे व्हेंटीलेशनचे उभे भुयार थेट डोंगरावर चौथरा करून बांधले जाणार असून या वायुविजन भुयारामधून हवा येऊ शकेल; मात्र, पावसाचे पाणी अथवा संततधार भुयारी मार्गात कोसळणार नाही, असे व्हेंटीलेशनचे स्वरूप असणार आहे.

Exit mobile version