तुषार दोशींना शिक्षा की, बढती

विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांवर हल्लाबोल


| मुंबई | वृत्तसंस्था |

जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीमार प्रकरणात अजून आदेश कोणी दिला याचाच थांगपत्ता लागलेला नाही, असे असताना तत्कालिन पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली पुण्याच्या गुन्हे अन्वेषण अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यामुळे दोशी यांना शिक्षा झाली, की गृहखात्याने बढती दिली, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दुसरीकडे, मंत्री दीपक केसरकर यांनी तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे तुषार दोषींच्या बदलीवरून सरकारमधील बेबनाव समोर आला आहे.

अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाला. त्या पोलिसी अत्याचारासाठी स्वतः गृहमंत्र्यांवर राज्याची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. लाठीमारानंतर जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा होती. मात्र कारवाईच्या नावाखाली त्यांना पुण्यात मक्रिम पोस्टफवर बदली मिळाली. याबाबत केसरकर यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहीत दोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे राज्य सरकारच्या कामकाजाबाबतची माहिती पत्रांवर पत्रे लिहिल्यानंतरही मिळत नाही, मात्र केसरकरांचे हे पत्र लगेच सार्वजनिक होते. हा सारा प्रकार म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे, असाच आहे. महायुतीचे सरकार हे जनतेला मूर्ख बनवू पाहणारे हेराफेरी सरकार आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Exit mobile version