त्वष्टा कासार समाजाने व्यवसायात प्रगती साधावी- दांडेकर

| रोहे | प्रतिनिधी |

त्वष्टा कासार समाजाने बदलत्या मागणी नुसार व्यवसायात चिकाटीने बदल आणि प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत वृत्त निवेदिका श्‍वेता वडके-दांडेकर यांनी व्यक्त केले. त्वष्टा कासार समाज संस्था अष्टमी-रोहा संस्थेच्या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा समारंभाप्रसंगी दांडेकर यांनी आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे निमित्त साधून समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार, भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. अतुल डाखवे यांचादेखील सत्कार करण्यात आला. प्रत्यकाने आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी नेहमीच अग्रेसर असले पाहिजे. आणि याच भावनेतून आज ग्रामपंचायतींचा निकालाचा दिवस असूनही वेळात वेळ काढून मला या छान कार्यक्रमात सहभागी होता आले याचा मला आनंद होत आहे, असे त्या म्हणाल्या.

या वेळी यासपिठावर प्रसिद्ध वेशभूषाकार मा.अतुल डाखवे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वडके, उपाध्यक्ष तेजस बोथरे, सचिव केदार साळवी, खजिनदार मनिष साळवी, सदस्य संजय आर्ते, संतोष डाखवे, अमित वडके, महीला मंडळ पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद साळवी यांनी केले.

श्रीविठ्ठलरखूमाई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटेपासूनच श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, पूजा श्री राजेंद्र एकनाथ डाखवे तसेच सत्यनारायण महापूजा श्री व सौ मंगेश एकनाथ डाखवे व महाआरती समस्त डाखवे परिवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. यावर्षी श्री राजेंद्र एकनाथ डाखवे यांना महाप्रसादाचा बहूमान मिळाला होता दुपारी 12 ते 3.30 पर्यंत महाप्रसादाचा लाभ समाज बांधव व गावकरी यांनी घेतला. सदर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मागील 3 वर्षांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने वरील सर्व कार्यक्रमांनी भरगच्च असा कार्यक्रम संपन्न झाला.

Exit mobile version