मोबाइल रिचार्जची रक्कम परत मिळविण्याच्या नादात घडला प्रकार
| पनवेल । वार्ताहर ।
मोबाइल रिचार्जची बँक खात्यातून वजा झालेली 399 रुपयांची रक्कम परत मिळविण्याच्या नादात एका सुरक्षारक्षकाने 2 लाख 65 हजार रुपये गमावल्याची घटना तळोजामध्ये उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
देवेंद्रदेव दीक्षित सिंग (29) हा 4 फेब्रुवारी रोजी कामावर असताना, जिओ सिमकार्ड ऑटो रिचार्ज झाल्याचे आढळले. त्यासाठी खात्यातून 399 रुपये वजा झाल्याचा त्याला मेसेज आला. त्यामुळे देवेंद्रदेवने गुगलवरून जिओ कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला. त्यानंतर फोनवरील व्यक्तीने त्याच्या मोबाइलच्या रिचार्जचे 399 रुपये आपोआप वजा झाल्याचे सांगितले. हे पैसे परत मिळविण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. फोनवरील व्यक्तीने देवेंद्रदेवला एक लिंक पाठवून देत ती इन्स्टॉल करायला सांगितले. त्यानुसार देवेंद्रदेवाने बँकेचा खातेक्रमांक टाकला. त्यानंतर ओटीपीही टाकला. त्यानंतर त्याच्या खात्यातून काही सेकंदांतच 1 लाख 65 हजार रुपये वजा झाले. त्यानंतर दुसर्या बँकेच्या खात्याची माहिती टाकण्यास भाग पाडून त्यात ओटीपी टाकण्यास सांगितले. त्यानंतर दुसर्या बँक खात्यातून 1 लाख वजा झाले. मात्र हे पैसे सायबरचोरांनी काढून घेतल्याचे लक्षात येताच त्याने बँकेत धाव घेऊन दोन्ही बँक खाती बंद केली. त्यानंतर त्याने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.