डोंबिवलीच्या उद्योजकाचा माथेरानला मदतीचा हात
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान नगरपालिकेचे उत्पन्न कमी आणि समस्या जास्त यामुळे काही कामे पूर्णत्वास जात नाही अशा वेळेस माथेरानवर निस्सीम प्रेम करणारे धावून येतात. असे डोंबिवलीच्या उद्योजकाने माथेरान या पर्यटनस्थळाला मदतीचा हात दिला आहे. येथील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ असलेल्या शार्लोट तलाव परिसरात स्वखर्चाने दोन बायो टॉयलेट्स तयार करून नागरिक व पर्यटकांची महत्त्वाची समस्या दूर केली आहे.
शारलोट तलाव हे माथेरान मधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळ असून येथे दररोज पर्यटकांची मांदियाळी असते. वन विभागाने येथे चार टॉयलेट्सची उभारणी केली आहे पण ते पूर्णतः दुर्लक्षीत आहेत. तेथे पाण्याची सोय नाही, स्वच्छता नाही त्यामुळे पर्यटकांची कुचंबणा व्हायची. ही गैरसोय टाळण्यासाठी येथील माजी नगराध्यक्ष अजय सावंत व विवेक चौधरी यांनी डोंबिवलीतील उद्योजक मित्र असलेले नितीन दळवी याना विनंती केली. त्यांनी ती मान्य करून दोन बायो टॉयलेट्स शारलोट तलाव परिसरात स्वखर्चाने आणून ते बसविले आहेत.
नगरपालिकेने त्वरित या बायो टॉयलेट्सला पाईपलाईन जोडणी करून पाण्याची व्यवस्था करून सात डिसेंबरपासून लोकांच्या सेवेत आणले आहेत. त्यामुळे आता महिलांची होणारी कुचंबणा थांबणार आहे. दरम्यान, पिसारनाथ मंदिर येथे महाभिषेक व भंडारा सोहळा असल्याने नितीन दळवी यांना आमंत्रित करून त्यांचा पिसारनाथ प्रवेशद्वारात स्थानिक नागरिकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला.