शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील टाकवे येथील शेतकरी बाळाराम भिकाजी काळोखे यांच्या दोन म्हशी दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान वंजारवाडी येथे असणार्या माळरानावर चरण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, म्हशींच्या अंगावर महावितरणची तार तुटून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती पशुपालकांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर माहिती देऊन तक्रार देताच लगेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोकडे, पोलीस हवालदार काठे यांनी घटनास्थळी जाऊन योग्य ती चौकशी केली. या घडलेल्या घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात आला असून, त्यानंतर पोलीस ठाण्यातून संबंधित विभाग यांना कळविण्यात आले आहे.
टाकवे येथील काळोखे कुटुंबिय पिढ्यान्पिढ्या शेतीसोबत दुग्धव्यवसाय करतात. सकाळच्या दरम्यान म्हशी पाजून झाल्यानंतर वंजारवाडी येथील माळावर म्हशी चरण्यासाठी नेल्या असता त्यातील नऊ म्हशींपैकी दोन म्हशींच्या अंगावर महावितरची जीर्ण झालेली प्रवाहित विद्युत तार पडल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. गुरख्याने प्रसंगावधान साधत स्वतःसह बाकी म्हशींना बाजूला केल्याने मोठी हानी होण्यापासून वाचविले. मिळालेल्या माहितीनुसार, सदर नुकसानीमध्ये अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे काळोखे यांनी सांगितले. तद्नंतर महावितरणकडून तुटलेली लाईन कट करून सदरचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. तार तुटून पडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी तसेच त्या भागातील एक फेज सुरू व्हायला किमान दोन दिवस लागतील, असे उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कर्जत डॉ. मिलिंद जाधव यांना संबंधित पशुपालक यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताच त्यांनी त्वरित पशुवैद्यकीय दवाखाना कशेळेचे डॉ. शशिकांत थोरात यांना घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पाहणी आणि चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. थोरात व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केला आहे.