माथेरानमध्ये ई-रिक्षा पलटी

दोन वृद्ध जखमी

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरानमध्ये लाल मातीच्या खराब रस्त्यामुळे प्रवाशांची वाहतूक करीत असताना ई-रिक्षा कलंडली. यावेळी ई-रिक्षामधून प्रवास करणारे दोन वृद्ध गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या दोन्ही वृद्धांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले.

पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील अमन लॉज परिसरात रस्त्यावरील पेवर ब्लॉक उखडल्याने ई-रिक्षा उलटून अपघात घडला. माथेरान शहरातील मुस्लिम मोहल्लामधील अब्बास महापुले आणि नूरजहाँ महापुले हे वृद्ध दाम्पत्य ई-रिक्षामधून दस्तुरीच्या दिशेने जात होते. काळोखी भागातील रस्त्यावरील उखडलेल्या क्ले पेव्हर ब्लॉकवरून रिक्षाचा टायर घसरला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. या अपघातात वृद्ध दाम्पत्यासह रिक्षाचालकही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ माथेरान शहरातील बी.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी नूरजहाँ आणि अब्बास महापुले यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र त्या दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ माथेरान येथून रुग्णवाहिकेतून नेरळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

या दुर्घटनेसाठी रिक्षाचालक नाही तर रस्त्यांची झालेली दुर्दशा जबाबदार असल्याचा आरोप जखमी महापुले दाम्पत्याने केला आहे. एसटीपी प्रकल्पानंतर बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक जागोजागी उखडल्याने येथील वळणदार रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, माथेरानमधील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणांची पाहणी करावी आणि ई-रिक्षांची संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक आणि पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version