दोन वृद्ध महिलांना लुबाडले
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल एसटी आगार सध्या गुन्हेगारी क्षेत्र बनत चालले असून मोठ्या प्रमाणात लुटमारीचे प्रकार, मारामारीचे प्रकार घडत आहेत. त्यातच दोन महिलांना लुबाडल्याची घटना घडल्याने महिला प्रवासी वर्गामध्ये भितीचे वातावरण आहे.
सुमिता कुथे (55) या आपल्या पतीसह पेण येथे जाण्यासाठी एस.टी.बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची गंठण लबाडीच्या इराद्याने चोरल्याची घटना घडली आहे. तर दुसर्या घटनेत प्रतिभा पाटील (61) यासुद्धा पनवेल-अलिबाग या एस.टी.बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे. याचबरोबर मोबाईल चोरणे, पर्स मारणे, वेश्या व्यवसाय आदी मोठ्या प्रमाणात या परिसरात चालू असून अनैतिक धंद्यांना व गुन्हेगारीला चांगलाच वाव मिळत असल्याने पनवेल शहर पोलिसांनी तसेच एस.टी.आगारातील सुरक्षा रक्षकांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे बनले आहे.