। पनवेल । वार्ताहर ।
लहान मुलांच्या भांडणावरुन शेजारी शेजारी राहणार्या दोन कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना करावे गावात घडली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या हाणामारीच्या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील 7 सदस्यांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
करावे गाव सेक्टर-36 मध्ये अशा जाधव ही महिला कुटुंबासह राहण्यास असून तिच्या शेजारीच कविता बनसोडे ही देखील कुटुंबासह रहाण्यास आहे. गत शनिवारी आशा व कविता या दोघांच्या मुलांमध्ये खेळण्यावरून भांडण झाले होते. यावरुन कविता व आशा या दोघींमध्ये सायंकाळी बाचाबाची झाली होती. मात्र त्यांनी सदरचा वाद मिटविला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी पुन्हा वाद होऊन शिवीगाळ व भांडण झाले. त्यानंतर या दोघींमध्ये हाणामारी सुरु झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील इतर सदस्यांनी सहभाग घेतला. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी हाताबुक्क्यांने व लाकडी काठीने एकमेकांना मारहाण केल्याने दोन्ही कुटुंबातील 4 ते 5 जण जखमी झाले. त्यानंतर या दोन्ही कुटुंबियांनी एनआरआय पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील कविता बनसोडे, वैशाली खैरनार, उज्वला उबाळे, सुभाष तायडे त्याचप्रमाणे आशा जाधव, शालीकराम जाधव, शेषराव साळवे या सात जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.