वैकुंठ पाटील यांना मिळणार उमेदवारी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महायुतीतील अंतर्गत वादानंतर आता भाजपमधील अंतर्गत वाददेखील चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पेणमध्ये भाजपचे दोन गट तयार झाले असून जिल्हा परिषद निवडणूकीत त्याचे पडसाद उमटणार असल्याची चर्चा सध्या जोर धरीत आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती स्व. प्रमोद (पिंट्या) पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देत भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेण्यात आला होता. मात्र, निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमधील समीकरणे बदलली असून दादर जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
सध्याच्या घडीला स्मिता पाटील यांचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवत माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात अस्वस्थता वाढली असून आश्वासन देऊन बाजूला सारले गेल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे धारप आता मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. ज्यांच्या शब्दावर पक्षप्रवेश झाला, त्याच शब्दाला आज किंमत उरलेली नाही का, असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.
दादरमध्ये प्रश्न केवळ उमेदवार कोण, एवढाच उरलेला नाही. खरा प्रश्न असा आहे की निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जात आहेत की वरून लादले जात आहेत? जर धारप प्रभावी नेते असतील, तर त्यांनी दिलेले आश्वासन मोडले कसे गेले? आणि जर निर्णय त्यांच्या हातातच नसेल, तर दादरमधील नेतृत्व नेमके कोणाचे, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या साऱ्या घडामोडींमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दादर मतदारसंघात तापलेले हे राजकारण आता केवळ अंतर्गत चर्चांपुरते मर्यादित राहिले नसून, धारप या पेचातून कसे बाहेर पडतात आणि भाजप नेमका कोणता निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या अचानक बदललेल्या राजकीय वाऱ्यामुळे धारप यांची मोठी गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकीकडे आश्वासनाचा मुद्दा, तर दुसरीकडे जुन्या नेत्यांचे वर्चस्व या संघर्षात नेमका भाजपचा निर्णय काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






