दगड उडून महिला आणि शाळकरी विद्यार्थी जखमी; तापकीरवाडी, धनगरवाडीत भीतीचे सावट
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा कंपनीच्या नवीन धरणासाठी सुरू असलेल्या सुरुंग स्फोटांचे हादरे आता थेट गावांपर्यंत पोहोचले आहेत. ब्लास्टिंगमधून उडालेले दगड अंगावर पडल्याने तापकीरवाडीतील एक महिला आणि शाळकरी विद्यार्थी जखमी झाला. प्रकल्पाचे काम सुरू असतानाच ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज दोन जण जखमी झाले; उद्या मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहात आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
टाटा धरणाच्या ब्लास्टिंगमुळे तापकीरवाडी, मोरमारावाडा आणि धनगरवाडीतील घरांना हादरे बसत असून, भिंतींना तडे जाण्याच्या तक्रारी आहेत. स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक भयभीत आहेत. धनगरवाडीतील घरे धरणाच्या अगदी जवळ असल्याने तेथील ग्रामस्थांनाही जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरावर नेमके कोणते परिणाम होतील, याची चिंता आतापासूनच व्यक्त होत आहे. ब्लास्टिंगमुळे आताच दगड घरांवर येत असतील, तर स्फोटांची तीव्रता वाढल्यास आणि धरणाचे काम पुढे गेल्यास परिस्थिती किती गंभीर होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तापकीरवाडीतील आदिवासी कुटुंबांना घरांसाठी पर्यायी जमीनही दिली जात नसल्याची तक्रार आहे.
दगड उडून महिला आणि विद्यार्थी जखमी झाल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी पाहणी करून दोघांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, यापूर्वी पाहणी होऊनही नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती जखमी कुटुंबातील हेमंत नवले यांनी दिली.
बाधित गावांतील सर्व घरांचे स्वतंत्र तांत्रिक सर्वेक्षण करावे, ब्लास्टिंगची तीव्रता आणि जमिनीतील कंपनांची शास्त्रीय नोंद घ्यावी, सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या त्रासाकडे कंपनी आणि प्रशासनाने आता तरी गांभीर्याने पाहावे, अशी त्यांची मागणी आहे.
