| नांदेड | प्रतिनिधी |
पोहण्यासाठी खदानीत उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदेडमधील गारगव्हाण गावात घडली. निखिल वाढवे (15) आणि संघर्ष पडघणे (16) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संघर्ष पडघणे याच्या नात्यात लग्न असल्याने तो गारगव्हाण येथे मामाच्या गावी आला होता. निखिल आणि संघर्ष हे बालमित्र होते. गुरुवारी दुपारी दोघही खदानीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी निखिलचा भाऊ सुमेधही सोबत होता. मात्र तो पोहायला उतरला नाही. संघर्ष आणि निखिल पोहायला उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खावू लागले. दोघांना बुडताना पाहून सुमेधने तात्काळ घरच्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनी खदानीकडे धाव घेत दोघांना बाहेर काढले. दोघांनाही उपचारासाठी हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.