। ठाणे । प्रतिनिधी ।
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ठाण्यातील एका तरुणाला महाराष्ट्र एटीएसने पकडले. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या संपर्कात राहून त्यांना हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या मुंबईतील संवेदन क्षेत्रातील गोपनीय माहिती तो पुरवीत होता. हनी ट्रपमध्ये अडकवून पीआयओ त्या तरुणाकडून हेरगिरी करून घेत होते, असे एटीएस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
ठाण्याच्या कळवा परिसरात राहणारा एक तरुण पीआयओच्या संपर्कात असून तो हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या मुंबईतील संवेदन क्षेत्राची माहिती त्यांना पुरवीत असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या ठाणे युनिटने त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता नोव्हेंबर 2024 रोजी त्याची फेसबुकवर एका पीआयओशी ओळख झाली होती. तसेच त्याने नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत त्या पीआयओला व्हॉट्सअपद्वारे हिंदुस्थान सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय व संवेदनशील माहिती वेळोवेळी पुरविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे एटीएसच्या ठाणे युनिटने त्याला अटक केली.
रवी मुरलीधर वर्मा (27) असे आरोपीचे नाव असून तो मुंबईच्या एका खासगी कंपनीत डिफेन्स टेक्नॉलॉजी विभागात ज्युनिअर इंजीनिअर पदावर काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्या घरात आई आणि एक बहीण आहे. पाकिस्तानी एजंटना माहिती पुरविल्याने दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.