| अलिबाग | प्रतिनिधी |
देवाच्या नावाखाली लाखोचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पनवेल येथील चौघांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक केले आहे. महेश मोरे, मिहीर मोरे, अपूर्वा मोरे, सागर कुंडअसे या आरोपींची नाव आहेत. यातील तिघेजण ठिकरूळ नाका येथे राहणारे असून एकजण चेंढरेमधील रहिवासी आहे.
ठिकरूळ नाका येथे महेश मोरे यांच्या घरात असलेल्या देवशिलेवर उभे करून त्यांच्या समस्या सोडविण्याचा गोरखधंदा सुरु होता. देवाच्या नावाखाली भिती दाखवून जादूटोणा करण्याचा प्रकार ही मंडळी करीत होते. पनवेलमधील कळंबोली येथील ठेकेदार गणेश कडव, नितीन पाटील, विघ्नेश सुर्वे हे देखील मोरे यांच्या जाळ्यात अडकले. या चौघांना घरातील देवशिलेवर उभे करून, पांढरा, सुती धागा याचे तुकडे करण्यात आले. त्यांच्या मनात दैवी भिती निर्माण करून त्यांच्याकडून 42 लाख रुपये, एक जेसीबी आणि थार चार चाकी गाडी लुटली. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरु होता. कडव व इतर मंडळींची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. महेश मोरे यांच्यासह चौघांविरोधात मंगळवारी (दि.27) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तिघांना बुधवारी (दि.28) मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी (दि.30) दुपारी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.