| कोल्हापूर | प्रतिनिधी |
कोल्हापुरातील राजारामपूरी येथील एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापूर पोलिसांचे क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेला साखळदंडातून मुक्त केले. सारिका साळी (40) असे बांधून ठेवलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरोगामी कोल्हापुरात क्रूरतेचा कळस गाठला आहे. राजारामपुरी येथील एका घरात महिलेला दोन महिन्यांपासून साखळदंडाने बंदिस्त ठेवून क्रूर वागणूक दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला असता संपूर्ण घटना उघडकीस आली. संबंधित महिला तिच्या भावाच्या घरी राहते. ती गतीमंद असल्याने रस्त्याने कुठेही फिरायची. फिरत असताना काहीही साहित्य उचलून न्यायची, यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून तिला घरातच कैद केले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी तिची सुटका करून रूग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.