। अलिबाग । प्रतिनिधी ।
पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या वाटेवर आहे. शेतांसह ठिकठिकाणी ग्रामीण भागात साप व इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढण्याची भिती आहे. सर्पदंशाच्या वाढत्या घटनांवर उपाययोजना व्हाव्यात, आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रात मुबलक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी शेकापच्यावतीने करण्यात आली आहे. शेकाप तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावेळी शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, युवक तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद घास, संजय माळी, युवक उपाध्यक्ष अॅड. पुनीत पाटील, अतुल पाटील, मस्जिद कुर, शशिकांत ठाकूर, अक्षय डिकले, यश पाटील आदी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागात सर्पदंश व इतर विषारी प्राण्यांच्या दंशाच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 24 तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असावेत. सर्पदंशावरील आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा. ग्रामीण भागात जनजागृती मोहिम राबविण्यात यावी, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ रुग्णवाहिका सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. तालुक्यात यापूर्वी अशा घटनांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. त्यामुळे यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.