खारेपाटातील ग्रामस्थांमध्ये संताप
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महावितरण कंपनीने स्मार्ट मीटर सक्तीने लावण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण विभागाच्या मनमानी कारभाराबाबत खारेपाटातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी महावितरण कार्यालयावर धडक देत उप कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन या प्रकाराबाबत प्रीपेड मीटरला तीव्र विरोध असून ते काम थांबविण्यात यावे अशी मागणी केली.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मार्फत जिनस कंपनी मर्यादित निर्मित अदानी यांच्या ठेकेदारच्या वतीने घरगुती प्रीपेड (स्मार्ट) मीटर बसवण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड देण्याचा डाव या विभागाने सुरु केला आहे. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कमलाकार अंबाडे यांना भुवनेश्वर 18 गाव समिती, ग्रामपंचायत वाघ्रण, सेवाश्रम सामाजिक विकास संस्था यांच्यावत्तीने निवेदन देण्यात आले.
हे मीटर बसवताना संबंधित कर्मचारी ग्रामपंचायतची, घर मालकाची कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी घेतली जात नाही. यापूर्वी बसविलेले इलेक्ट्रॉनिक मीटर योग्य पद्धतीने कार्यरत असून सुद्धा आता हे नवीन प्रीपेड मीटर कशाला असा प्रश्न ही ग्रामस्थानी संबंधित अधिकार्यांना विचारला. आम्हाला हे नवीन मीटर नको असून त्याला खारेपाटातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. मीटर बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्यात यावे. अशी मागणी यावेळी ग्रामस्थांच्या वत्तीने करण्यात आली. प्रीपेड मीटर बसवण्याचे काम थांबले नाही तर 18 गावातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी मानव अधिकार संरक्षण समितीचे रायगड ज़िल्हा जनसंपर्क अधिकारी कृष्णकांत पाटील, भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट 18 गाव समितीचे पदाधिकारी, वाघ्रण ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पाटील, दीपक पाटील, दयानंद म्हात्रे, नरेंद्र पाटील, घनश्याम पाटील, रामकृष्णा पाटील, धनंजय मोकळ आदी उपस्थित होते.