संतापजनक! दोन चिमुकलींवर स्कूल बसचालकाकडून अत्याचार

। पुणे । प्रतिनिधी ।

स्कूल बसचालकाकडून दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात दोन चिमुकल्या मुलींवर 45 वर्षीय ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना वानवडी परिसरात घडली आहे.

घटनेतील आरोपी एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडतो. दोन्ही पीडित मुली या त्याच्या बसमधील पुढच्या सीटवर बसायच्या. गेल्या चार दिवसांपासून तो चालक दोन्ही मुलींशी अश्लील कृत्य करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. घडलेल्या घटनेबद्दल कुणालाही सांगायचं नाही, अशी धमकीही त्या नराधमाने मुलींना दिली होती. मात्र पीडित मुलींपैकी एक मुलगी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टजवळ वेदना होऊ लागल्या. तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने ड्रायव्हर काकांनी केलेल्या दुष्कर्माबद्दल आईला सांगितले आणि हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पालकांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version