| पनवेल | वार्ताहर |
तळोजा येथे रिक्षा आणि मोटारसायकल यांच्यामध्ये झालेल्या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला व्यक्ती उडून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलीस हवालदाराच्या अंगावर पडल्याने पोलीस हवालदार आणि त्यांच्या अंगावर पडलेला व्यक्ती दोघेही जखमी झाल्याची घटना घडली. या दोघांवर तळोजा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव किशोर कर्डिले (44) असे असून, ते तळोजा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कर्डिले हे रात्रपाळीवर असल्याने त्यांना व पोलीस हवालदार शिंदे यांना बिट मार्शलची ड्युटी देण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास पोलीस हवालदार कर्डिले व शिंदे हे दोघेही तळोजा येथील बेल चौकीसमोर रस्त्याच्या बाजूला उभे होते. या वेळी आयजीपीएलकडून नावडेच्या दिशेने एक भरधाव मोटारसायकल जात होती. याचवेळी त्याच्या समोरुन येणाऱ्या एका रिक्षाने देवीचा पाडाकडे जाण्यासाठी अचानक उजवीकडे वळण घेतल्याने मोटारसायकल चालकाला वेग आवरता आला नाही. त्यामुळे या मोटारसायकल रिक्षाच्या पुढील चाकावर जावून धडकली. या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला विजय कांबळे हा उडून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलीस हवालदार कर्डिले यांच्या अंगावर पडला. त्यामुळे कर्डिले खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. तसेच त्यांच्या अंगावर पडलेला विजय कांबळे हा देखील जखमी झाला. पोलीस हवालदार शिंदे यांनी दोघा जखमींना साई हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तळोजा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या मोटारसायकल चालक मो. आयुब इरशाद खान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.