मोटार सायकल चोरणाऱ्या दोघाजणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केले जेरबंद

अनेक गुन्हे उघडकीस
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सीसीटीव्ही फुटेजवरून मोटारसायकल चोरणाऱ्या दुकलीला अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या दुकलीकडून चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या चौकशीत तब्बल सात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. मयूर गणपत विशे, वय 21 रा.खडवली,ता. शहापूर, जि. ठाणे मूळ रा. बेडीसगाव, ता. शहापूर जि.ठाणे आणि महेश भालचंद्र खापरे, वय 27, रा. राजेंद्र नगर, बोरीवली पूर्व मुंबई. मूळ रा.सरळगाव, ता. मुरबाड असे या दोघांची नावे आहेत.

दि 29 ऑक्टोबर 22 रोजी कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी बाबत गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांचेकडून सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम आणि पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपी मयूर गणपत विशे. रा शहापूर, ठाणे हा आढलून आला. त्यानुसार टीम मधील पोलिस हवालदार म्हात्रे यांना त्याच्याबाबत माहिती मिळताच त्याला शहापूर येथून ताब्यात घेतले.

मोटर सायकल चोरीबाबत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार महेश भालचंद्र खापरे, रा. बोरिवली, मुंबई याच्या साथीने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याबाबत कबुली दिली. त्यानुसार या दोघांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून कर्जत, कस्तुरबा मार्ग, पो.ठाणे मुंबई, वाशिंद पो. ठाणे, जि.ठाणे, शहापूर पो. ठाणे, जि.ठाणे येथे मोटासायकल चोरी केल्या आहेत.

या दोघांकडून 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या चोरीस गेलेल्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्याव्यतीरिक्त कबुली कर्जत, बदलापूर पोलिस ठाण्यात दोन असे आणखी तीन गुन्हे उघडकीस आले. सदर कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उप निरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार सुधीर मोरे, प्रतीक सावंत, राकेश म्हात्रे, चालक स.फौ. देवराम कोरम यांचा समावेश आहे.

Exit mobile version