| जळगाव | वृत्तसंस्था |
दोन दुचाकींनी एकाचवेळी टॅक्सीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. शनिवारी (दि.7) रात्री 10 च्या सुमारास जळगावमधील दहीवद फाट्याजवळ ही घटना घडली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन भरधाव दुचाकीने समोरून आलेल्या ओमीनी टॅक्सीला धडक दिली. या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. शुभम पारधी, विजय पाटील आणि केवाराम पावरा अशी या तिघांची नावे आहेत. हे सर्वजण चोपडा येथील रहिवाशी होते. तिघे त्यांच्या इतर तीन मित्रांसह ता. अमळनेर येथे केटरर्सच्या कामासाठी दुचाकीने गेले होते. रात्री काम आटोपून सर्वजण चोपड्याकडे निघाले होते. त्याचवेळी दहीवदजवळ अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी समोरून आलेल्या टॅक्सीला धडकली. या अपघातामध्ये टॅक्सीचालकासह चार जण जखमी झाले आहेत.