नवी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
| पनवेल | प्रतिनिधी ।
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एका अल्पवयीन मुलीसह दोन पीडित मुलींची सुटका केली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दिपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नवी मुंबई परिसरात गौतम नावाचा व्यक्ती 16 ते 17 वर्षांच्या मुलींसह महिलांना ग्राहकांकडे वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. संपर्क साधल्यानंतर आरोपीने मुलींना प्लॉट क्रमांक 2, सेक्टर 19-ए, वाशी येथे आणले. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने छापा टाकून रेखा रंजन मजूमदार (वय ३८) हिला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात तिने पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन व दोन पीडित मुलींना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसायात ढकलल्याचे निष्पन्न झाले. तसेच पीडित मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांच्याकडून 6 हजार रुपये स्वीकारल्याचेही तपासात समोर आले. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध एनपीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला मंगळवार दि. 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, सहायक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस हवालदार सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल, पावडे, चालक पोलीस हवालदार मोहिते, पोलीस शिपाई ठाकूर, चव्हाण, कोलते आणि पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
