पनवेल ते इंदापूर महामार्गाची दयनीय अवस्था

प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

पनवेल ते इंदापूर महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाला 16 वर्ष उलटून गेली तरी चौपदरी करणाचे काम धिम्यागतीने चालू असल्यामुळे ज्या ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत आहे. अशा ठिकाणी महामार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर्षी सुध्दा बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असे जनतेला वाटत आहे.

कोलाड नाक्याच्या मधोमध उड्डाणपूलाचे काम होणार असल्याने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग करून दिला आहे. त्याठिकाणी मुसळधार पावसामुळे खड्डे आणि चिखल साचल्याने वाहन जाताना पादचाऱ्यांची खराब पाण्याने अंघोळ होत आहे. मुंबईकडे जाण्यासाठी आणि महाडकडे जाण्यासाठी ज्या ठिकाणी एस.टी. थांबा आहे तेथे देखील दयनीय अवस्थेत प्रवाशांना जीव मुठीत घेऊन स्टँड गाठावा लागत आहे. नाक्यापासून वरसगाव पेट्रोल पंप आणि त्याच्यापुढे खड्डेच खड्डे निर्माण झालेले असल्यामुळे कोलाड नाक्यापासून वाहनांच्या रांगा लागत आहेत. यावर्षी तरी बाप्पांचे आगमन सुरक्षितपणे होईल अशी जनतेची इच्छा होती. परंतु, ती अपयशी ठरली आहे. रस्ता रुंदीकरणात लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेली 16 वर्षे त्यांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा करावी लागली आहे.

Exit mobile version