| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील पिरकोन परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मृणाल मनोहर जोशी (27) रा. टाकीवाडा, ता. उरण, जि. रायगड हे प्लेझर दुचाकीवरून प्रवास करत होते. पिरकोन येथील साई सहारा हॉटेलसमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचा आरोप आहे. जखमी अवस्थेत जोशी यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
