वडाळे तलावाजवळ दुचाकीस्वारांची मनमानी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांवर कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील ऐतिहासिक वडाळे तलाव परिसरात दुचाकीस्वारांच्या वाढत्या धुमाकूळमुळे स्थानिक व ज्येष्ठ नागरिक, तसेच संध्याकाळी फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून या तलावाचे सुशोभीकरण केले असून, हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहे. मात्र, काही बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे या परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. तरुण दुचाकीस्वार तलावाच्या बाजूच्या रस्त्यांवर सुसाट वेगाने गाड्या चालवतात आणि धोकादायक स्टंट्स करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. गाड्यांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजात फटाके फोडल्यासारखा आवाज करत गाड्या फिरवल्या जातात. त्यामुळे परिसरात तीव्र ध्वनी प्रदूषण निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी उपलब्ध आहेत. याठिकाणी उद्भवणाऱ्या तक्रारीनंतर अनेकदा स्थानिक पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाने देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणे, मोटरसायकलवर ट्रिपल सीट किंवा चारसीट प्रवास करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मोटरसायकलवरून फिरणाऱ्या तरुणांवर वाहतूक शाखेच्या पथकाने नियमानुसार कारवाई केली. कारवाईदरम्यान संबंधित मोटरसायकल चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version