| खांदा कॉलनी | प्रतिनिधी ।
पनवेलच्या कोळीवाडा-उरण नाका परिसरातील ब्रिटिशकालीन जुना पूल धोकादायक झाल्याने काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता याच पुलावरून पुन्हा दुचाकींची सर्रास वाहतूक सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे धोकादायक घोषित केलेल्या पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू कशी झाली? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अनेक वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या या पुलाची संरचना जुनी झाली असून, पुलाच्या सुरक्षिततेबाबत यापूर्वीच प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक बंद केली होती. मात्र, सध्या दुचाकीस्वार या पुलाचा पुन्हा वापर करत असल्याने संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.
पुलावरून दुचाकींची ये-जा सुरू असताना संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची सद्यस्थिती तपासावी आणि पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे की नाही, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू राहिल्यास एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
धोकादायक पुलावरून दुचाकींची वाहतूक
