भाजपाच्या दहाव्या यादीतही नाव नाही
| सातारा | वृत्तसंस्था |
अवघ्या काही दिवसांत देशभरात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झालेलं असताना सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. त्यात काही जागांवर इच्छुक उमेदवारांनी दावे करायला सुरुवात केली आहे. त्यात साताऱ्याची जागा असून भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या जागेवर दावा केला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. त्यांनी थेट उमेदवारी गृहीत धरूनच उत्तर देत असल्याचं सांगितलं. त्यामुळे भाजपाच्या यादीच्या आधीच उदयनराजेंनी स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केल्याचं बोललं जात आहे. ‘आता मी राज्यसभेचा खासदार आहेच. पण लोकसभेविषयी विचाराल तर नक्कीच मी लोकसभेचा उमेदवार म्हणूनच तुमच्याशी बोलतोय’, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याविषयी उदयनराजे म्हणाले, “भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. दुसऱ्या पक्षांनी कुणाला उमेदवारी दिली माहिती नाही. पण साहजिक आहे. लोकशाहीमध्ये कुणीही उमेदवार उभे करू शकतात. उमेदवारी जाहीर झालीच असेल. दरम्यान, भाजपाच्या 10 याद्या येऊनही त्यात उदयनराजे भोसलेंच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून खरंच उमेदवारी मिळेल का आणि न मिळाल्या अपक्ष निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उदयनराजे भोसलेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.
उमेदवारी मिळणार नाही हे तुम्ही कसं सांगू शकता? छोट्या लग्नाच्या याद्या करणं सोपं असतं. पण हे मोठं लग्न आहे. याला वेळ लागेल. मी सगळंच नियोजन आत्ता सांगितलं तर समोरच्या उमेदवाराला सगळंच आयतं मिळेल. कसं करायचं काय करायचं ते मी बघतो”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. “मी कुणालाही विरोधक समजत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात”, असं सूचक विधानही त्यांनी केलं.