। कर्जत । प्रतिनिधी ।
श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. यावेळी हजारो स्वामी भक्तांनी दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
प्रगटदिनानिमित्त पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकडआरती, सकाळी महाअभिषेक, स्वामी याग, दुपारी महाआरती आणि भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हेमांगी पाकणीकर आणि सहकारी यांचा सुर संस्कार प्रस्तुत भक्तीनाद हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला. पळसदरी स्वामी समर्थ मठ प्रकटदिन सोहळ्याचे निमिताने विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्तीचा ‘आठवण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. त्यात डॉ. नितीन आरेकर, दिनेश अडावदकर यांचा अॅड. राजेंद्र निगुडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाला डॉक्टर केले त्याबद्दल आदर्श पालक म्हणून श्रीमती रेवती केवरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विक्रांत दरेकर, राजू पोतदार आदी उपस्थित होते.