। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महामार्गावर कळंबोली मॅकडोनाल्ड या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणारे अनेक वाहन चालक बेशिस्त पणे वाहन उभी करत असतात. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा मोठी वाहतूक कोंडी होते. यावेळी बेशिस्तपणे वाहन उभी करणार्या वाहन चालकांची बैठक आयोजित करून समज देण्याचे काम कळंबोली वाहतूक विभागाकडून करण्यात आले.
मुबंई-पुणे दृतगती महामार्गाचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्या कळंबोली मॅकडोनाल्ड समोर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक विभागाच्या अधिकार्यांकडून बुधवारी (दि.10) प्रवासी वाहतूक करणार्या वाहतूकदारांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी वाहन चालकांनी मॅकडॉनल्ड्स या ठिकाणी विनाकारण वाहने थांबून वाहतूक कोंडी होईल असा कुठल्याही प्रकार करू नये, टप्पा वाहतूक करू नये, बसेस फक्त एका लेनलाच थांबतील, विनाकारण दुसर्या लेनच्या पुढे आल्यानंतर इतर जाणार्या वाहनांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच, बस मालक यांनी त्यांच्या वाहनावर असलेल्या प्रलंबित इ-चलन दंड तात्काळ भरून घ्यावा, आशा सूचना करण्यात आल्या. तर सर्व वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतील इत्यादी बाबतच्या सूचना दिल्या. यापुढे गैरप्रकार करणारे व वाहतुकीचे नियम न पाळणार्यांविरुद्ध वाहतूक विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी समज देखील यावेळी देण्यात आली. या बैठकीला 35 ते 40 वाहन चालक व मालक हजर होते. यावेळी कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बाणकर तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.