। म्हसळा । वार्ताहर ।
स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अनेक विकासाची वेगवेगळी कामे होत आहेत. दोन वर्ष आधी स्वदेस फाउंडेशनने गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वप्नातील गाव या स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये अनेक गावांनी भाग घेतला होता. यामध्ये म्हसळा तालुक्यातील आंबेत उगवतवाडी आणि घोणशे वडाचीवाडी गावानेही भाग घेतला होता.
म्हसळा तालुक्यातील आंबेत, उगवतवाडी आणि घोणशे वडाचीवाडी गावे नुकतेच स्वदेस फाऊंडेशनतर्फे स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले. दोन्ही वाड्यांवरील ग्रामस्थ, महिला, तरुणवर्ग व गावविकास समिती तसेच, स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या जल्लोषात व पारंपारीक वाद्याच्या सोबत सोहळा संपन्न झाला. यावेळी स्वदेस फाऊंडेशनचे संचालक निता हरमलकर, उपसंचालक प्रसाद पाटील, प्रशांती मिकायला, शिवतेज ढऊळ, मेघना फडके आणि ग्रामसेवक विष्णू शेंडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्वप्नातील गाव घोषित करताना गाव विकास समितीच्या सदस्यांनी स्वप्नातील गाव होण्यासाठी येणार्या अडथळे व त्यावर केलेली मात याविषयी सर्वांना माहिती दिली. गावात मागील दोन वर्षापासून झालेल्या गावाच्या प्रगतीची माहिती दिली. गाव विकास समितीने शासकीय योजनेतून अंतर्गत झालेली कामे आणि गाव विकास समितीने क्राउड फंडिंग जमा करुन गावातील उर्वरित कामांसाठी निधी उभारण्यात आला यावर चर्चा केली.
यावेळी स्वदेस फाऊंडेशनचे संचालक निता हरमलकर, उपसंचालक प्रसाद पाटील यांनी समितीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. तसेच, त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.