| पेण | प्रतिनिधी |
क्रांतिकारी बिरसा मुंडा हे केवळ आदिवासींचे प्रेरणास्थान नव्हते, तर समाजपरिवर्तनाची तळमळ बाळगणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात जागा करून देणारे तेजस्वी नेतृत्व होते. त्यांची ‘उलगुलान’ चळवळ म्हणजे केवळ बंड नव्हे तर, अन्याय, शोषण आणि दडपशाहीविरोधातील जाज्वल्य ज्वालाग्राही घोष होता.
स्वाभिमान, सामूहिक ऐक्य आणि प्रतिकारशीलतेचा धगधगणारा भूगर्जन प्रत्यक्षात आणणारे बिरसा मुंडा हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या अस्मितावादी आवाजांपैकी एक होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. त्या बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शासकीय आदिवासी प्रकल्प कार्यालय संचलित आदिवासी मुलींच्या वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.
आजच्या काळातही आपल्या मनातील अंधाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, भेदभावाविरुद्ध आणि अधिकारांसाठी जागृती करुन उभे राहण्याची गरज आहे. बिरसा मुंडांचे आदर्श आपल्याला एकत्र येऊन समाजसक्षमीकरणाचा मार्ग दाखवतात, असेही डॉ. पाटील यांनी नमूद केले. या कार्यक्रमात सहायक प्रकल्प अधिकारी सुप्रिया पाटील यांच्यासह महाविद्यालयीन आदिवासी विद्यार्थिनी, सामाजिक कार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि संस्थेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना मानसी पाटील यांनी केली आणि हा उपक्रम शासनाच्या बिरसा मुंडा सप्ताहाचा एक भाग असल्याची माहिती दिली. याप्रसंगी आदिवासी कार्यकर्ते नीरा वीर आणि महेश पवार यांचा सहायक प्रकल्प अधिकारी सुप्रिया पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुप्रिया पाटील यांनी शासनाच्या धोरणांची माहिती दिली; तर महेश पवार यांनी आपले सामाजिक उपक्रम मांडत तरुणांना प्रेरणा दिली. नीरा वीर यांनी ‘अंकुर ट्रस्ट’च्या पंधरा वर्षांच्या प्रवासाची कथा सांगत महिला नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले.
उलगुलान म्हणजे अन्यायाविरोधातील जाज्वल्य ज्वालाग्राही घोष: डॉ. वैशाली पाटील
