उमटे धरणाची जलवाहिनी फुटली; 60 हजारांहून अधिक नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
धरणात मुबलक पाणी, मात्र पाईपलाईन फुटल्याने हजारो नागरिकांच्या नळाला पाणीच नाही, अशी अवस्था ऐन पावसाळ्यात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील फणसापूर येथे उमटे धरणाची पाईपलाईन फुटल्याने 40 गावे आणि 22 वाड्यांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी (दि.25) दुपारपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, ऐन गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः महिलांचे मोठे हाल झाले. तब्बल 60 हजारांहून अधिक नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
अलिबाग तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 47 वर्षांपूर्वी उमटे धरण उभारण्यात आले. या धरणातून सुडकोली, रामराज, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, आक्षी, नागाव, वरंडे, चौल, रेवदंडा आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीतील 40 गावे आणि 22 वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यावर 60 हजारांहून अधिक नागरिक अवलंबून आहेत.
शुक्रवारी सकाळपासूनच गणेश विसर्जनासाठी जाण्यापूर्वी घरात पाणी भरून ठेवण्याची लगबग सुरू होती. मात्र, दुपारी बारानंतर अचानक नळाला पाणी येणे बंद झाले. सायंकाळपर्यंत पाणी येईल, या आशेने नागरिक वाट पाहात राहिले. अखेर फणसापूर येथे उमटे धरणाची मुख्य पाईपलाईन फुटल्याची माहिती सोशल मीडियावरून समोर आली. पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले असून, दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
शुक्रवारपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेषतः महिलावर्गाचे मोठे हाल होत आहेत. उमटे धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ पाईपलाईन फुटल्याने 40 गावे आणि 22 वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकाराची स्थानिक प्रशासनाला वेळेत माहिती नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली.
फणसापूर येथे पाईपलाईन ब्रेक झाली आहे. ती दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम झाल्यास रविवारी सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल. नागरिकांनी सहकार्य करावे.
– निहाल चवरकर, अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग







