बस आगाराकडून अनधिकृत बांधकाम

काँक्रिट भिंतीचे काम थांबवण्याचा नगरपालिकेचा आदेश

| महाड | वार्ताहर |

महाड एसटी स्थानकाच्या मागील बाजू असलेली दगडी संरक्षक भिंत पाडून त्या ठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभी करण्याचे काम सुरू आहे. या कामाची कोणत्याच प्रकारची परवानगी महाड नगरपालिकेकडून घेण्यात आलेली नाही, तसेच सदरचे बांधकाम नियोजित प्रारूप विकास आराखड्यानुसार नसल्याने हे बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी रोहिदास नगर रहिवाशांनी केली आहे.

महाड एसटी स्थानकामध्ये गेली अनेक वर्षे अनियोजित कामे केली जात आहेत, यामुळे ही कामे अल्पावधीतच नादुरुस्त होत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. महाड स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यालगत असलेली दगडी संरक्षक भिंत पाडून या ठिकाणी काँक्रिटची भिंत उभी करण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्या ठिकाणी जुनी भिंत होती, त्याच ठिकाणी नवीन भिंत उभी करण्याचे काम केले जात असल्याने रस्ता रुंदीकरण, आगारातील पाण्याचा निचरा, नगरपालिकेच्या गटाराचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. यामुळे स्थानिक रोहिदास नगर रहिवाशांनी सदरचे काम बेकायदेशीर असून, हे काम त्वरित थांबवावे, अशी मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी चौक मार्गावर रस्त्यालगतच या काँक्रिट भिंतीचे काम सध्या सुरू आहे. या भिंतीमुळे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग रुंदीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच येथे गटार बांधणेदेखील शक्य होणार नाही. यामुळे आगारात साचणारे पाणीदेखील योग्य रीतीने निचरा होणार नसल्याने एसटी आगार प्रशासनाने नवीन प्रारूप आराखड्यानुसार बांधकाम करावे, अशी मागणी रोहिदास नगर रहिवाशांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद महाडिक, रोहिदास तरुण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चांदोरकर, दत्तात्रय महाडिक, अनिल महाडिक, शिवाजी रामदास महाडिक, उमेश महाडिक आदी उपस्थित होते. महाड नगरपालिकेनेदेखील सदरचे बांधकाम थांबवावे, अशी सूचना एसटी महामंडळाला केली आहे.

महाड शहरातील संत रोहिदास नगर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाच्या उत्तरेकडे सर्वे नंबर 128 मधील सिटी सर्वे नंबर 2055 व 2056 या जागेच्या दक्षिण बाजूस महाड एसटी बस प्रशासनाकडून संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या बांधकामाला महाड नगरपरिषदेने कोणतीच परवानगी दिलेली नाही. परवानगी न घेता हे काम सुरू करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने 1957 रोजी ही जागा आगाराकरिता संपादित केली आहे. 1957 रोजी संरक्षक भिंतीचे काम झाले आहे. महाड नगर परिषदेने शहराच्या लोकसंख्येच्या वाढीचा विचार करून 1984 रोजी प्रारूप विकास आराखडा शासनाकडून मंजूर करून घेतला, त्यानुसार 1957 रोजी बांधलेली संरक्षक भिंत आता प्रारूप विकास आराखड्यानुसार बांधणे आवश्यक होते. महाड आगारामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे, शिवाय छत्रपती शिवाजी मार्गावरील पावसाचे पाणीदेखील येथील गटारात निचरा होत असते. या बांधकामामुळे आगारातील पाणीदेखील योग्य निचरा होत नसून बांधकाम साहित्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले गटार भरले गेले आहे. या ठिकाणी वळण असल्याने कायम वाहतूक कोंडी होते. तसेच एसटीच्या मोठ्या बसेसदेखील कायम अडकून राहतात. यामुळे सदरचे संरक्षक भिंतीचे काम प्रारूप मंजूर आराखड्यानुसार केले जावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

या ठिकाणी कायम वाहतूक कोंडी होते. यामुळे एसटी महामंडळाने आपली संरक्षक भिंत प्रारूप विकास आराखड्यानुसार आतमध्ये घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता आणि कोणतीच परवानगी न घेता काम सुरू आहे.

प्रमोद महाडिक,
माजी नगरसेवक,
महाड
Exit mobile version