आ.जयंत पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची कबुली
। मुंबई । प्रतिनिधी ।
पवनेल तालुक्यातील रोडपाली येथील सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतचा मुळ प्रश्न शेकापचे आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तरात असे म्हटले की, रोडपालीत बांधण्यात आलेल्या बांधकामाची सिडकोच्या नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभागातर्फे पाहणी करण्यात आली. तेथे पत्रा शेड, गॅरेजे, लोखंडी केबिन, वाहनतळ, वीट बांधकामे अशी अतिक्रमणे तसेच मातीचा भराव टाकलेला दिसून आला. त्यापैकी पाच गॅरेजे, दोन कॅन्टिन, एक धाबा तोडण्यात आला आहे. तसेच बौद्धवाडीलगत असणार्या भूखंडावरील अनधिकृत पार्किंग हटविण्यात आले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शासकीय, निमशासकीय किंवा खासगी जमिनीवरील अनधिकृत झोपड्या व अन्य बांधकामे पावसाळयामध्ये तोडण्यात येऊ नये, असे शासन निर्देश असल्यामुळे ते पाडण्यात आले नाही, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
पनवेल मनपाचे तत्कालिन उपमहापौर व तत्कालिन शिक्षण सभापती यांनी रोडपाली येथील बौद्धवाडी सेक्टर 18, कळंबोली येथील पाच एकर क्षेत्रावर सिडकोच्या अखत्यारित असलेल्या 500 कोटी रुपयांच्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे केली आहेत. ती करताना त्यांनी पद आणि अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी केला. अनधिकृतपणे व्यवसायिक चाळ, बहुमजली इमारत, मोठे पार्किंग, मोबाईल टॉवरची उभारणी केली असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणत ती त्वरित पाडून टाकावीत, अशी मागणीही त्यांनी केली.